चष्मा घातलेला आंधळा भारतीय!

National
National Flag of India

नववीत असतानाचा एक किस्सा सांगतो. टिव्हीवर १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला मेहुल कुमार दिग्दर्शित आणि मुख्य भूमिकेत नाना पाटेकर, डिंपल कपाडिया, परेश रावल असे दिग्गज असलेला चित्रपट ‘क्रांतिवीर’ बघत होतो. त्यात हिंदू-मुस्लिम वर एक प्रसंग होता, जेव्हा नाना म्हणजेच प्रताप त्याचा मित्र इस्माईलला हिंदू-मुस्लिम यांच्यातला फरक काय आहे किंवा काय नाही हे समजावून सांगतो. आणि आपल्यात भांडण लावून त्याचा फायदा आपले नेते मंडळी कसे घेतात हे सांगण्याचे काम डिंपल म्हणजेच मेघा करते.

मी शाळेत कमी आणि शाळेच्या बाहेर जास्त भटकणारा विद्यार्थी असल्याने आणि माझं वाचनही कमी असल्याने तेव्हा तो प्रसंग इतका कळला नव्हता मला, कारण तोवर हिंदू-मुस्लिममध्ये एकमेकांविरुद्ध इतका द्वेष, इतका तिटकारा असू शकतो ह्याचा कधी साक्षात्कार झाला नव्हता आणि म्हणून ह्याचा अंदाजही नव्हता. आणि दुसरं कारण म्हणजे हिंदू हे मंदिरात जाऊन रामाची पूजा करतात आणि गुडी पाडवा साजरा करतात, तर मुस्लिम हे मशिदीत जाऊन अल्लाहची इबादत करतात आणि रमजान ईद साजरी करतात ह्या व्यतिरिक्त मला जास्त काही माहिती नव्हतं. पण वर दिलेला प्रसंग पाहून इतकंच कळलं होतं की, माणूस कुठल्याही धर्मातला असला किंवा कुठल्याही जातीतला असला तरी त्यात वाहणारं रक्त हे लालच रंगाचं आहे.

डिप्लोमाच्या प्रथम वर्षाला असताना केमिस्ट्रीचा पेपर अवघड गेला होता, त्यानंतर देवाजवळ केलेल्या विनवण्या आणि त्याला दानपेटीत दिलेली लाच आठवताना आता हसू येतं मला. इतकं करून देखील त्या सेमीस्टरमध्ये तो विषय राहिला माझा. पण हीच खरी परिस्थिती होती माझी. माझ्याबरोबर काहीही चुकीचं घडलं तर देवाजवळ जाऊन सांगायचं तो ते सगळं ठीक करतो. त्याला विश्वासाने काही मागितलं, तर तो ते आपल्याला मोठ्या मनाने भरभरून देतो. पण ह्या वेळेस आणि अशा बऱ्याच वेळेस देवाने धोका दिलेला मला आठवतोय. मला वाटलं की मी पूजा करताना किंवा देवाची भक्ती करताना कुठेतरी चुकतोय म्हणून म्हटलं आपण जितकी होईल तितकी त्याची पुस्तकं, पोथ्या, पुराण वाचू आणि बघू काय होतंय ते असं म्हणून वाचनाला सुरुवात केली.

शाळेतली मित्र मंडळी जोशी, कुलकर्णी, क्षेमकल्यानी, गायधनी असल्याने देवाची बरीच पुस्तकं, पोथ्या, पुराण मिळणं सोपं होतं. नापास झालेल्या केमिस्ट्रीचा आणि इतर विषयांचा अभ्यास बाजूला सारून वाचायला सुरुवात केली. बघता बघता निरंतर ४–५ महिने वाचन केलं. इतकं वाचून झालं होतं की मुला-मुलीचं लग्न ही लावून त्यानंतर असलेली सत्यनारायणाची पूजा ही करू शकत होतो आणि कोणी वारलं तर १० दिवस गरुड पुरणाचे पाठ घेऊन त्यानंतर दहावं, तेरव्याची पूजा ही करू शकतो इथपर्यंत. ह्या दरम्यान बरीच मंदिरे उलथा पालथ करून, मंदिरातल्या पुजाऱ्यांचे डोकी चाळून झाली होती. त्यांना बरेचशे प्रश्न विचारून भंडावून सोडलं होतं. पण जो देव मी शोधायला निघालो होतो त्याचा कुठेही ठावठिकाणा लागत नव्हता. विचारलेल्या प्रश्नांची समाधाकारक उत्तरं मिळत नव्हती, पण मी प्रश्न विचारत राहिलो. मी प्रश्न विचारणं कधीच थांबवलेलं नाही. आमच्या एका गुरूने शिकवलेलं असल्याने, प्रश्न विचारणं थांबवणं मला शक्यही नव्हतं.

ह्या सगळ्या प्रसंगाने मी १८० अंशात विरुद्ध झालो. मंदिरात जाणं, आरतीला टाळ्या वाजवणे, प्रसाद खाणे, घरच्या देवाजवळ नमस्कार जोडणं सगळं सगळं सोडून दिलं. मी देवाविरोधातच बंड पुकारल्याने, घरात खूप भांडणं ही झाली. घरातली लोकं, गल्लीतली लोकं, जवळचे मित्र मंडळी तिरस्काराने माझ्याकडे बघायची पण मी त्याची पर्वा केली नाही, मी माझ्या विचारांवर ठाम होतो. समाजाच्या दृष्टीकोनातून सांगायचं झालं, तर आता मी आस्तिक राहिलो नव्हतो तर नास्तिक झालो होतो.

माझा स्वतःवर असलेला विश्वास दृढ झाला होता. घरातल्या लोकांनी, समाजातल्या लोकांनी, मित्र मंडळींनी लहानपणापासून घालून दिलेले बरेचशे चष्मे निखळून पडले होते. डोळे असूनही आंधळ्यासारखं जीवनाकडे, समोर असलेल्या दूनियेकडे बघणंही बंद झालं होतं. म्हणून समोर दिसणाऱ्या कोणालाही मी एका ठराविक चौकटीत मोजणं, मोडणं, बसवणंही थांबलं होतं. तू कुठल्या जातीचा आहे? तो कुठल्या धर्माचा आहे? ह्याच्या पलीकडेजाऊन मी त्याला एक माणूस म्हणून स्पष्टपणे बघू शकत होतो.

४–५ महिन्याच्या वाचनाने जर इतका काही बदल होत असेल हे कळल्यानंतर माझं बाकी विषयात सुद्धा गोडी निर्माण होऊ लागली. माझ्यातल्या जिज्ञासू वृत्तीने, प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवल्याने, आणि विषयाच्या गाभाऱ्यात जाऊन सत्याचा स्वीकार केल्याने माझे विचार आणि मी स्वतःसुद्धा समृद्ध होऊ लागलो.

शाळेतल्या फळ्यावर बऱ्याच वेळा वाचलेल्या सुविचाराचा अर्थ कळला होता मला. इतक्या दिवस मूर्तिमंत देवाची पूजा करणाऱ्या मला माणसा माणसात देव दिसू लागला होता. मी शोधणाऱ्या देवाने मला खुद्द साक्षात्कार घडवला होता. मला देव सापडला होता.

मी ही पोस्ट लिहिताना २६ वर्षाचा आहे. मागच्या काही वर्षात बऱ्याचशा विषयांवर वाचन झालं आणि अशा वेगवेगळ्या विषयांचे चुकीचे लावलेले बरेचशे चष्मे निखळून पडले. पण हे चुकीचे चष्मे लागले कसे ह्याचं उत्तर शोधत असताना एक प्रकर्षानं जाणवलं की, ह्या सगळ्यात आपल्या परिवाराचा खास करून आपल्या पालकांचा आणि आपल्या मित्र मंडळींचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी लहान पणापासून, शाळेत असताना बऱ्याच अशा गोष्टी शिकवल्या होत्या त्याचा ह्या काळात काही उपयोग नाही किंवा ते आऊटडेटेड झाले आहे असं समजलं. त्यांचे विचार तितके अपडेटेड नाही पण आपण आपले विचार समृद्ध करूच शकतो की, ते तर आपल्याच हातात आहे ना. हे साध्य झालंच तर तेच अपडेटेड विचार आपण आपल्या घरच्यांच्या आणि जवळच्या लोकांच्या मनामध्ये रुजवू शकतो.

काळानुरूप आपापल्या विचारांमध्ये, धर्मामध्ये बदल हा झालाच पाहिजे ह्यावर मी आजही ठाम आहे. त्यासाठी तुम्हाला बराच संघर्ष करावा लागू शकतो. पण संघर्ष न करता सत्य तरी कसं सापडेल आणि तुमची प्रगती तरी कशी होईल. स्वतःला दुसऱ्यांच्या विचारांमधून मुक्त करण्यासाठी तुम्ही लावलेले चुकीचे आणि जुने चष्मे काढणं गरजेचं आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्ष झाली, तरी देखील आजही हिंदू-मुस्लिम ह्यांच्यामधला द्वेष आणि तिरस्कार बघून मला दुःख होतं. त्यासाठीच हा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि माझे मत तुम्हा सगळ्यांना सांगतो आहे.

हिंदू, हिंदुत्व, हिंदूराष्ट्र, हिंदू स्वराज्य समजण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता, वेद, उपनिषद, स्वामी विवेकानंद, विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा बऱ्याचशा व्यक्तीचं लिखाण वाचू शकता. फक्त शिव जयंती तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे साजरी करून आणि आपल्या गाडीला भगवे झेंडे फडकत शहरभर, गावभर धुरळा उडवत आपण स्वतःला जर हिंदू म्हणत असाल तर ते आधी बंद करा. रामाचे नाव घेऊन जर तुम्ही मुसलमानांना मारत अथवा शिवीगाळ करत असाल तर स्वतःला हिंदू कसं काय म्हणवून घेऊ शकता?

ज्यांना इस्लाम धर्म समजून घ्यायचा असेल, जिहादचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर त्यांनी क़ुरआन शरीफ, रूमी, सआदत हसन मंटो, साहिर लुधियानवी, फ़ैज़ अहमद फ़ैज़, कैफ़ी आज़मी, जॉन एलिया, चिराग़ अली, मुहम्मद इक़बाल, शिबली नोमानी, सैयद अहमद ख़ान, सैयद आमिर अली, वहीदुद्दीन ख़ान अशा कित्येक लोकांकडून तुम्ही शिकू शकता. जिहादच्या नावाखाली ज्या निष्पाप हिंदू लोकांचा बळी घेतले जातात ज्यात मुसलमान सुद्धा मरतो, अशा निर्दयी नराधमांना अल्लाह कसं काय माफ करेल? कशी काय जन्नत कुबुल करेल?

एकमेकांच्या धर्माबद्दल आणि देवाबद्दल जर तुमचं वाचून झालं असेल, तर तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या आणि जुनाट वाटू शकतात. तरी देखील तुमचा अजूनही जर तुमच्या धर्मावर विश्वास असेल तर त्यात आजच्या काळानुसार संपूर्ण मानवतेसाठी चांगले असतील असे बदल करून एकमेकांच्या धर्माचा आणि देवाचा आदर करायला शिका. एवढं सगळं वाचून झालंच असेल तर त्यांना एक विनंती आहे, त्यांनी “भारताचे संविधान — The Constitution of India” वाचून काढा. प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावं असं पुस्तक आहे. त्यात तुमचे हक्क, अधिकार अशा अत्यावश्यक गोष्टींची इत्यंभूत माहिती ह्यामध्ये तुम्हाला मिळेल. असे बरेचसे वाद मागील काही दिवसात होताना मी बघितले, ज्याचं कारण फक्त भारतीयांचे अज्ञान हे होय.

भारत सरकारने जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली आहे आणि ती गोष्ट जर आपल्याला मान्य नसेल, तर त्याचा आदर राखून देखील आपण नम्रपणे विरोध करू शकतोच की. त्यासाठी मोठ्या मोठ्या जीवघेण्या दंगली करणं, आणि वेगवेगळ्या जाती धर्मावरून एकमेकांना मारत सुटणं, सरकारी मालमत्तेची नासधूस करणं हे काही त्यावरचं उत्तरं नव्हे. Covid19 च्या संवेदनशील प्रसंगावर पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र येण्यासाठी जर घरी बसून टाळ्या किंवा स्टीलच्या प्लेट वाजवायला सांगितले असेल किंवा सगळे विजेचे दिवे बंद करून तेलाचा दिवा लावायला सांगितला असेल तर त्याचा अर्थ असा होत नाही की सगळे रस्त्यावर उतरून त्याचं वेड्याचे प्रदर्शन करायला हवं, ते साफ चुकीचं आहे. तसेच ह्याच संवेदनशील प्रसंगात सुद्धा मुस्लिम लोकांनी राजधानीत इतक्या मोठ्या संख्येने एकत्र राहून धार्मिक बैठीकी घेणे आणि त्यानंतर सरकारी लोकांना न कळवता अख्या भारतात आपापल्या गावी परतणं चुकीचं आहे. सरकारी आदेशानुसार मंदिरं, मशिदी बंद असतानाही मंदिरात दर्शनाला जाणं आणि दर शुक्रवारी मस्जिदमध्ये जाऊन नमाज पठण करणंही चुकीचंच आहे. ज्या गोष्टी घरात बसूनही होऊ शकतात त्यासाठी बाहेर जाणे कितपत योग्य आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

आपण स्वतःच्या आणि आपल्या सभोवतालच्या परिसरात असलेल्या लोकांच्या जीवनाशी खेळतो आहे. आपण सुद्धा ह्याच भारताचे नागरिक आहोत ह्याचे भान आपल्याला असलं पाहिजे. इतक्या संवेदनशील प्रसंगाला आपण सर्वांनी किती गांभीर्याने घ्यायला हवं, हीच ह्या वेळेत आपली सर्वांची जबाबदारी आहे.

हिंदूंनी भगवे चष्मे घातलेले असल्यामुळे समोर असलेला कोणताही मुस्लिम त्यांना अँटी-हिंदूच तर मुस्लिम लोकांनी हिरवे चष्मे घातलेले असल्याने त्यांनाही प्रत्येक हिंदू हा मुस्लिम विरोधीच दिसणार आहे. ते चष्मे काढून आपण समोरच्याला एक माणूस म्हणून माणुसकीच्या नजरेने कधी पाहायला शिकणार आहोत हा प्रश्न स्वतःला विचारा. धर्माचं गणित चुकतंय, धर्माची व्याख्या ज्या दिशेने बदलायला हवी त्याच्या विरुद्ध दिशेला ती जाते आहे असं मला कैक वेळा वाटतं. मी वाचताना, अभ्यास करताना शिकलो कुठलाही धर्म हा माणसाने माणसांसाठी, मानवतेच्या रक्षणासाठी बनवलेला आहे. पण आज पाहताना त्याउलट दिसतं, माणूस धर्माची रक्षा करतो आहे, माणूस देवाची रक्षा करतो आहे. खरंच धर्माला आणि देवाला त्यांच्या रक्षणासाठी आपल्यासारख्यांची मदत हवी आहे का? दोन हात, तिसरं मस्तक जोडून देखील तो खुश आहे ना, समोरच्या व्यक्तीचा आणि त्याच्या धर्माचा आदर करा. इतकं केलं तरी एकमेकांविरोधात असलेला द्वेष आणि तिरस्कार आपण कमी करत संपवू शकतो.

चुकीची माहिती पुरवणे, लोकांमध्ये पॅनिक तयार करणे, लोकांना भडकावणे ह्यात सोशल मीडिया आणि भारताची खराब पत्रकारितेचा मोठा वाटा आहे. म्हणून आपण काय वाचतो आहे, कुठून वाचतो आहे, वाचलेली माहितीमध्ये किती सत्य आहे ह्याचा शोध घ्या आणि मगच विश्वास ठेवा ही विनंती.

भारताच्या तिरंग्या बद्दल थोडेसे बोलतो, कारण तसं बघायचं झालं तर ह्यात सुद्धा भगवा आणि हिरवा हे दोन्ही रंग आहेत.

  • वरच्या भागात गडद केशरी रंग आहे. या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
  • मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
  • खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
  • निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय’ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

आपल्या तिरंग्याचा मान आपण राखला पाहिजे.

मी एक संकल्प केला होता, आहे; एक स्वप्न बघितलं होतं, आहे “अखंड भारता”चं ते पूर्ण करण्यासाठी आणि भारताला भविष्यकाळात महासत्ता बनवण्यासाठी आपण सगळे जण एकत्र येऊन हे सत्यात उतरवू शकतो. हे असे धुळीत माखलेले, जुने पुराणे चष्मे काढून टाकू आणि पुढे जाऊया. माझा संघर्ष सुरू आहे तुम्हीही या ह्या संघर्षात, स्वप्नात सहभागी व्हा, असं तुम्हा सर्वांना आव्हान करतो.

© Abhishek Katyare

07/04/2020

Nashik

--

--

Seeker of truth, who is on the path to becoming a mystic.

Get the Medium app

A button that says 'Download on the App Store', and if clicked it will lead you to the iOS App store
A button that says 'Get it on, Google Play', and if clicked it will lead you to the Google Play store